Home चंद्रपूर तर्री पोह्याचा झणझणीतपणा मंदावला…

तर्री पोह्याचा झणझणीतपणा मंदावला…

तर्री पोह्याचा झणझणीतपणा मंदावला…

चंद्रपूरच्या खाद्यसंस्कृतीला ओळख देणारे ‘तर्री पोह्यांचे जनक’ राजेश लाखे यांचे दुःखद निधन

चंद्रपूर :-  चंद्रपूर शहराच्या खाद्यसंस्कृतीला एक वेगळी, झणझणीत ओळख मिळवून देणारे तर्री पोह्यांचे जनक श्री. ज्ञानेश्वर ऊर्फ राजेश लाखे यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यक्ती नाही, तर चंद्रपूरकरांच्या सकाळच्या चवीचा, आठवणींचा आणि जिव्हाळ्याचा एक अविभाज्य भाग हरपला आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

अनेक वर्षांपासून आपल्या खास चवीच्या तर्री पोह्यांद्वारे त्यांनी असंख्य रसिकांची मने जिंकली. साधेपणा, मेहनत आणि सातत्य यांच्या बळावर त्यांनी तर्री पोह्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यांच्या हातची तर्री म्हणजे केवळ एक पदार्थ नव्हता, तर चंद्रपूर शहराची खाद्यओळख बनली होती.

लहानपणापासूनच त्यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय होता. प्रतिकूल परिस्थितीशी सातत्याने झुंज देत त्यांनी आयुष्य घडवले. बालपणी त्यांच्या आई ‘लाल मिरची’चा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्या संघर्षाचे साक्षीदार राजेश लाखे स्वतःही होते. पुढे त्यांनी ऑटो व्यवसायात पाऊल ठेवले. संसारातील चढ-उतार, ताणतणाव असूनही ते कधीच खचले नाहीत.

चंद्रपूर शहरात त्यांनी प्रथमच तर्री पोह्यांचा वेगळा आणि अनोखा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, मात्र मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी या व्यवसायात घवघवीत यश मिळवले. याच व्यवसायामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आणि ते आजही ‘चंद्रपूरचे तर्री पोह्यांचे जनक’ म्हणून ओळखले जातात.

आभाळभर यश मिळूनही त्यांनी आपला ऑटोचा व्यवसाय कधीच सोडला नाही. जमिनीवर पाय रोवून राहणारा, कष्टाळू आणि साधा स्वभाव हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासारखी हेअरस्टाईल ठेवल्यामुळे मित्रपरिवाराने त्यांना प्रेमाने ‘राजेश’ हे नाव दिले आणि पुढे ते याच नावाने सर्वत्र प्रसिद्ध झाले.

कालांतराने वृद्धत्वामुळे त्यांनी तर्री पोह्यांचा व्यवसाय बंद करून कांदा भजी आणि मिरची भजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. परिस्थिती बदलली, व्यवसाय बदलले; मात्र संघर्ष आणि मेहनत अखेरपर्यंत सुरूच राहिली.

आपल्या चारही मुलींची त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्ने लावून दिली. सर्व मुली सुखी संसार करत आहेत, हे समाधान त्यांच्या वाट्याला आले. मात्र त्यांची लाडकी नात “पायल” हिचा विवाह पाहण्याचे स्वप्न अपुरेच राहिले, ही बाब त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि चाहत्यांसाठी मनाला चटका लावणारी ठरली.

वयाच्या ७७व्या वर्षीही रोज नित्यनेमाने काम करत राहणे हेच त्यांच्या जिद्दीचे, कर्तृत्वाचे आणि जगण्यावरील प्रेमाचे प्रतीक होते. त्यांची जीवनकहाणी आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच असंख्य ग्राहकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या आठवणी, संघर्ष आणि त्यांनी दिलेली झणझणीत चव चंद्रपूरकरांच्या स्मरणात कायम राहील.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏🙏🙏


श्री. धीरज अशोकराव साळुंके
      महाकाली वार्ड, चंद्रपूर
     📞 7719945254