Home Breaking News छोटूभाई पटेल हायस्कूलमध्ये ‘ॲनिमेशन आणि डिजिटल दुनियेत करिअर’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान

छोटूभाई पटेल हायस्कूलमध्ये ‘ॲनिमेशन आणि डिजिटल दुनियेत करिअर’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान

छोटूभाई पटेल हायस्कूलमध्ये ‘ॲनिमेशन आणि डिजिटल दुनियेत करिअर’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान

कै. स्वप्नील महावादीवार स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमाला – तिसरे पुष्प उत्साहात संपन्न

चंद्रपूर :-  येथील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कै. स्वप्नील महावादीवार स्मृतीप्रित्यर्थ आयोजित “व्याख्यानमाला – तिसरे पुष्प” अंतर्गत ‘ॲनिमेशन आणि डिजिटल दुनियेत करिअर’ या विषयावर मार्गदर्शनपर व प्रेरणादायी व्याख्यान मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना सशक्त, जागरूक व भविष्योन्मुख नागरिक घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

News reporter :- अतुल दिघाडे

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक राजीव मानकर सर, पर्यवेक्षक विकास निंबाळकर सर, सुदर्शन बरापात्रे सर, त्रिशुल बंम सर, सुहास पडोळे सर, प्रकाश होळंबे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे रामू खांडरे, धीरज साळुंके, पराग जवळे, चंद्रकांत कोतपल्लीवार, लोकेश येनूरकर, जितेंद्र मशारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व अनुभवी वक्ते यांनी विद्यार्थ्यांना ॲनिमेशन व डिजिटल क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले. ॲनिमेशन, व्हीएफएक्स, ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांतील आवश्यक कौशल्ये, आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व तसेच भविष्यातील रोजगाराच्या व्यापक संधी त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केल्या. डिजिटल माध्यमांमध्ये सर्जनशीलतेसोबतच क्रिएटिव्ह मेंदूचा प्रभावी वापर कसा करता येतो, यावर त्यांनी विशेष भर दिला.

आपल्या तब्बल २१ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी या क्षेत्रात करिअर करताना व्यवसाय कसा सुरू करायचा, स्वतःची ओळख (ब्रँडिंग) कशी निर्माण करायची आणि जागतिक स्तरावर काम करण्याच्या संधी कशा उपलब्ध आहेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जग वेगाने डिजिटल होत असताना रोजगाराच्या संधी स्थानिक स्तरावरच निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करण्याची गरज कमी होत आहे, हा महत्त्वाचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला.

तसेच महाराष्ट्र सरकारच्या नागपूर येथे फिल्म सिटी सुरू करण्याच्या योजनेचा उल्लेख करत, विदर्भातच कौशल्यसंपन्न मनुष्यबळ तयार झाल्यास नागपूर व संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे स्थानिक तरुणांसाठी ॲनिमेशन व डिजिटल क्षेत्र हे सुवर्णसंधी ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. या उपक्रमातून माजी विद्यार्थ्यांची आपल्या शाळेबद्दलची आपुलकी आणि सध्याच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची बांधिलकी ठळकपणे दिसून आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकवृंदासह माजी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना ॲनिमेशन व डिजिटल क्षेत्रातील असंख्य करिअर संधींची ओळख होऊन भविष्यासाठी नवी दिशा मिळाल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले.