




📰 बल्लारशात पुन्हा गुन्हेगारीचे सावट — बार मालकासह वेटरवर लाठीकाठीने हल्ला; पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह
चंद्रपूर / बल्लारपूर :
चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांचा सिलसिला थांबता थांबेना! विशेषतः बल्लारशा शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) रोजी मध्यरात्री बल्लारशा येथे घडलेल्या एका घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीवर प्रश्न निर्माण केला आहे. किरकोळ वादातून चार युवकांनी बार मालक संघर्ष ढोके आणि वेटर आदर्श गलगट यांच्यावर लाठीकाठीने हल्ला केला.
ही घटना २६ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे १ वाजता रेल्वे चौकात घडली. वेटर आदर्श गलगट (२२) हा मित्र कृष्णा मेकला (२५) याच्यासह चहा पित असताना आरोपी निर्भय याने किरकोळ कारणावरून वाद घातला. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांना फोन करून बोलावले. काही वेळातच आरोपी नवाब, मुकदर आणि फैजान दुचाकीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांवर लाठीकाठीने बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात आदर्श गलगट याच्या डाव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली, तर बार मालक संघर्ष ढोके यांच्या मनगटाला व चेहऱ्याला मार लागल्याने रक्तस्राव झाला. घटनेनंतर दोघांनी बल्लारशा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपी निर्भय, नवाब, मुकदर आणि फैजान यांच्याविरुद्ध कलम ३५२, ३५१(२), ३(५), ११८(१), ११५(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे बल्लारशातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, “पोलिस प्रशासन नक्की कुठे कमी पडत आहे?” असा सवाल उपस्थित होत आहे.





