Home चंद्रपूर लक्षवेधी :- भाजपात सर्वात जास्त शिकलेल्या लढाऊ मुनगंटीवारांना मंत्री पद कां नाही?

लक्षवेधी :- भाजपात सर्वात जास्त शिकलेल्या लढाऊ मुनगंटीवारांना मंत्री पद कां नाही?

विदर्भातील भाजपचा सर्वसमाज समावेशक चेहरा असलेल्या सुधीर मुनगंटीवारामुळेच पक्षाला बळकटी.

लक्षवेधी :-

राज्याच्या राजकारणात मागील पाच वर्षात अमुलाग्र बदल पाहायला मिळाले असून आज ह्या पक्षात तर उद्या त्या पक्षात कोलांटउड्या मारणाऱ्या राजकीय नेत्यामुळे जनतेचा राजकारणावरचा विश्वास जणू उडाला असल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली आहे, पक्षनिष्ठा वेशीला टांगून स्वतःचं चांगभलं करण्यासाठी वाट्टेल त्या स्थराला जाणाऱ्या राजकारणी नेत्यांनी राजकारणाचं चिखल करून टाकलं असतांना काही राजकारणी नेते मात्र पक्षाच्या संकट काळात आणि पक्षाच्या भराभराटीच्या काळात सुद्धा एका दीपास्तंभासारखे एकनिष्ठ राहिले आहे, त्यात आजच्या घडीला सुधीर मुनगंटीवार यांचं नावं घ्यावं लागेल, कारण ज्या वेळी भाजप च्या चिन्हावर निवडणुकीत कुणी उभं राहायला तयार नव्हतं तेंव्हा सुधीर मुनगंटीवार हे वयाच्या 17 व्या वर्षी महाविद्यालयातील भाजप समर्थित संघटनेकडून निवडनुक लढलें व जिंकले आणि लगेच 1981 मध्ये ते चंद्रपूर शहर भाजप चे सरचिटणीस झाले.दरम्यान आज त्यांना मंत्रिपद नं देता परस्पर डावलल्या गेलं असल्याने जिल्ह्याच्या भाजप गोटात कमालीची नाराजी असून यामुळे भाजप ला अंतर्गत फटका बसण्याची शक्यता नाकरता येत नाही.

महाविद्यालयीन जीवनापासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. छात्रसंघाचे सरचिटणीस ते राज्याचे अर्थमंत्री अशी झेप त्यांनी घेतली. भाजपात सर्वात जास्त शिकलेले अभ्यासू, हजरजबाबी आणि उत्कृष्ट वक्ते असलेल्या मुनगंटीवार यांची राजकीय कारकिर्द ही अतिशय संघर्षशील राहिली, कारण त्यांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर पक्षाला मोठं तर केलंच पण आपल्या वैधानिक आयुधांचा वापर करून त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात विरोधी बाकावर असतांना सुद्धा अनेक निर्णय सरकारला घेण्यास भाग पाडून कीर्तिमान स्थापित केले, त्यात बल्लारपूर तालुक्याची निर्मिती, गोंडवना विद्यापीठाचा लढा आणि चंद्रपूर गडचिरोली या जुळ्या जिल्ह्याचे स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती, स्वतंत्र खनिज विकास मंत्रालयाची निर्मिती, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग आयोगाची निर्मिती, नागपूर विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नावं व अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा हे नावं देण्याच्या लढ्यात त्यांचा विधिमंडळातील लढा निर्णायक ठरला, त्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे केवळ चंद्रपूर जिल्ह्याचे नेते नाही तर ते महाराष्ट्राचे नेते ठरले आणि म्हणूनच त्यांना 2014-19 च्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री हे मोठं खात मिळालं होतं.

सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म 30 जुलै 1962 रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. सुधीर मुनगंटीवार यांनी एम. कॉम., एल. एल. बी., एम. फिल., डी. बी. एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत. खरं तर महाराष्ट्रातील राजकारणात श्रीकांत जिचकार यांच्यानंतर सर्वात जास्त पदव्या ह्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेचं आहे आणि प्रखर वक्ता आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य यामुळे त्यांचं भाजप मध्ये मोठं वजन आहे आणि म्हणूनच त्यांना 2010 ते 2013 या काळात भाजपने प्रदेश अध्यक्ष बनवलं होतं त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महासचिव होते, पण आता राजकारणं फिरलं आणि दिल्लीश्वराकडे ज्यांची उठाबस तोच राज्यात मोठा नेता या तत्वाने देवेंद्र फडणवीस यांची बाजू सरशी झाली आणि त्यांनी आपला दुसरा प्रतिस्पर्धी स्ट्राँग होऊ नये म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कट केला, महत्वाची बाब म्हणजे भाजप च्या विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव सर्व भाजप आमदारापुढे ठेवणारे म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना समर्थन देणारे सुधीर मुनगंटीवार हेच पुढे असतांना त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान नाही म्हणजे ही अतिशय गंभीर बाब आहे, दरम्यान ज्या जिल्ह्यात भाजपचे सहापैकी पाच आमदार निवडून येतात त्या जिल्ह्याला मंत्रिपद नाही म्हणजे ही त्यापेक्षा भयंकर दुःखद बाब आहे. हे भाजप श्रेष्ठिनी समजून घ्यायला हवे, कारण चंद्रपूर जिल्ह्याचा भाजपात जो चेहरा आहे तो सुधीर मुनगंटीवार हाच आहे आणि त्यांच्यामुळेच भाजप ला जिल्ह्यात मजबुती आहे अन्यथा बाकी नेते केवळ त्यांचे व्यक्तिगत कामे करतात असा एकूण राजकीय समज आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न दिल्याने भाजपला मोठं नुकसान सहन करावं लागेल हे निश्चित.