Home चंद्रपूर चिंतनीय :- किशोर जोरगेवार सारख्या खोटारड्या उमेदवारांना जनता का निवडून देते?

चिंतनीय :- किशोर जोरगेवार सारख्या खोटारड्या उमेदवारांना जनता का निवडून देते?

जनतेला नेमकं काय हवंय? हेच मुळात कळायला मार्ग नसल्याची सुज्ञ नागरिकांची खंत.

चंद्रपूर :-

नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीत जे निकाल लागले त्यात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील किशोर जोरगेवार हे जवळपास 21 हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले, मागील निवडणुकीत जनतेला “200 युनिट वीज मोफत देणारं” हे गाजर दाखवून किशोर जोरगेवार यांनी तब्बल 72 हजार पेक्षा जास्त मतांधिक्यानी विजय मिळवीला होता. दरम्यान आमदार बनल्यानंतर किशोर जोरगेवार जनतेला दिलेले आश्वासन पाळेल आणि प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या व त्यामुळे विविध आजारानी त्रस्त जनतेला किमान वीज बिलात सूट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र संधीसाधू, स्वार्थी व ढोंगीपणाचा कळस गाठणारे किशोर जोरगेवार यांनी जनतेच्या या ज्वलंत प्रश्नाकडे डोळेझाक करून राजकीय फायदा घेण्यासाठी सत्तेसाठी कोलांटउड्या मारल्या, स्वतःचं आर्थिक हित जोपसलं आणि सतत पाच वर्ष सत्तेत राहून सुद्धा 200 युनिट वीज मोफत देण्याचं जनतेला दिलेलं आश्वासन पाळलं नाही, एवढंच नव्हे तर मागील पाच वर्षात वीज बिलात प्रचंड वाढ होऊन जनतेचे आर्थिक शोषण करून सरकारने महागाईच्या खाईत जनतेला ढकलले असतांना किशोर जोरगेवार यांनी मात्र विधानसभा सभागृहात या विषयी आवाज उठवला नाही ही अतिशय लज्जास्पद बाब असून किशोर जोरगेवार यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे, पण आश्चर्य या गोष्टीच आहे की अशा विश्वासघातकी माणसाला जनतेने का निवडून दिले? हेच कळायला मार्ग नसल्याच्या भावना सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होतं आहे.

मागील 2019 मध्ये किशोर जोरगेवार पहिल्यांदा अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांना कुणी पाठिंबा मागितला नसताना ते सरळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन त्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले, दरम्यान भाजप शिवसेना युती तुटली आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार बसले तअसता लगेच ह्याच किशोर जोरगेवार यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंब्याचे पत्र देऊन महाविकास आघाडीत सामील असल्याचे दाखवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने पडले, त्या दरम्यान ज्या शिवसेना आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड केले असल्याचे त्यांनी जाहीर केले व उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिवसेनेचे जवळपास चाळीस आमदार एकनाथ शिंदे च्या नेतृत्वात सुरत ते गुहाहाटी गेले त्यात किशोर जोरगेवार यांचं सुद्धा हिंदुत्व धोक्यात आलं आणि “बिन बुलाये मेहमान” च्या स्थितीत त्यांनी गुहाहाटी गाठली, म्हणजे काहीही कारण नसताना व महाविकास आघाडी सरकार ला त्यांनी अगोदरचं पाठिंबा दिला असतांना त्यांनी स्वार्थासाठी गुहाहाटीची सैर केली आणि पन्नास खोके एकदम ओके च्या विरोधकांच्या घोषणाचे फुकट बळी ठरले, यावरून जणू सरड्यालाही लाजवेल असे राजकीय रंग त्यांनी बदलवले, पण ज्या जनतेने त्यांना मोठया विश्वासाने निवडून दिले त्या जनतेच्या प्रश्नांचे काय? याचे उत्तर मात्र आजपर्यंत जनतेला मिळाले नाही ही अतिशय चिंतनीय बाब आहे.

भारतीय लोकशाही आता वेगळ्या वळणावर आली आहे, साम, दाम, दंड, भेद या चाणक्य नितीचा वापर करून निवडनुका जिंकण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे, एरव्ही उमेदवाराचा सेवाभाव व चारित्र्य पाहून लोकं निवडणुकीत मतदान द्यायचे, लोकं उमेदवरांचा प्रचार करण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करायचे पण आता जनतेला पैसे हवे आहे कारण लोकप्रतिनिधी हे काहीही कामाचे नाही, त्यांनी दिलेले आश्वासन ते पाळत नाही म्हणून जनतेचा लोकप्रतिनिधी यांच्यावरचा विश्वास उडाला असल्याने निवडणूकीच्या काळात उमेदवारांकडून मतदानाचे पैसे घेतात आणि त्यामुळे खऱ्या चारित्र्यवान उमेदवारांना सुद्धा याचा फटका बसतो आणि मग पैसे वाटणारे खोटारडे स्वार्थी ढोंगी लोकं निवडून येतात आणि खऱ्या लोकशाहीची विटंबना होते ही वस्तुस्थिती आहे. या कक्षेतील आमदार किशोर जोरगेवार यांनी आजपर्यंत जनतेची दिशाभूल करून जी राजकीय पोळी भाजली त्याचा कुठेतरी विरोध व्हायला हवा, पण आपली जनता पैशानी विकल्या जाते याचे वास्तव आता या निवडणूकीच्या माध्यमातून समोर येत आहे. जनतेला दिलेल्या 200 युनिट वीज प्रश्नाचे तर सोडाच जे ज्वलंत प्रश्न आहे ते सुद्धा बाजूला करून किशोर जोरगेवार यांनी महाकाली उत्सव, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांनी केवळ जनतेचे मनोरंजन केले, मग प्रश्न हा उपस्थित होतो की किशोर जोरगेवार यांना महाकाली उत्सव, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी जनतेने निवडून दिले का? हा प्रश्न उपस्थित होतं आहे. दरम्यान आज ह्या पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून घिरट्या घालून उद्या दुसऱ्या पक्षाची तिकिटं घेऊन निवडणूक लढविणारे दलबदलू यांच्या इतिहास व वर्तमान बघता त्यांना जनतेने कुठल्या करणासाठी निवडून दिले हे कोडेच आहे.