Home Breaking News आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मोरवा विमानतळ विस्तार व आधुनिकीकरणाला गती

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मोरवा विमानतळ विस्तार व आधुनिकीकरणाला गती

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मोरवा विमानतळ विस्तार व आधुनिकीकरणाला गती

आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे त्वरित कार्यवाहीचे निर्देश

मुख्यमंत्र्यानी दिले महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकाला कार्यवाहीचे निर्देश

चंद्रपूर :-  दि.१६ – चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. मोरवा विमानतळाच्या विस्तार व आधुनिकीकरणासाठी आ. मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संबंधित प्रस्तावाची तातडीने दखल घेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपक कपूर यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या सकारात्मक निर्णयामुळे मोरवा विमानतळाच्या विस्तार व आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळणार असून, चंद्रपूरच्या औद्योगिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला नवे बळ प्राप्त होणार आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

मोरवा विमानतळाच्या विस्तार, आधुनिकीकरण तसेच धावपट्टीच्या वाढीव कामांना गती मिळावी यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन विकासासाठी विमानतळाचा विस्तार अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आ. मुनगंटीवार यांनी मांडलेल्या मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठीच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्ती, ऊर्जा उत्पादन, सिमेंट उद्योग, पोलाद उद्योग आणि वनसंपदेच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र म्हणून चंद्रपूरची ओळख निर्माण झाली आहे. मात्र, वाढत्या औद्योगिक आणि पर्यटनविषयक गरजांच्या तुलनेत येथील विमानतळाची सुविधा अपुरी असल्याने विकासाला मर्यादा येत असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

सध्या चंद्रपूर विमानतळाची धावपट्टी सुमारे ९०० मीटर लांबीची असून छोट्या प्रवासी विमानांच्या उड्डाणासाठी ती अपुरी आहे. भविष्यात नियमित हवाई सेवा सुरू करण्यासाठी धावपट्टीचा विस्तार, डीजीसीए मानकांनुसार सुविधा उभारणे आणि अन्य पायाभूत विकासकामे करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे चंद्रपूर विमानतळ विकासाचा मार्ग अधिक सुकर झाला असून, या प्रकल्पामुळे जिल्ह्यात उद्योग, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मोरवा विमानतळ विस्ताराचा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न सातत्याने सुरू राहील, अशी ग्वाहीही आ. मुनगंटीवार यांनी दिली.