Home चंद्रपूर धक्कादायक :- चांदा शिक्षण प्रसारक मंडळ भ्रष्टाचार प्रकरणी नागपूर शिक्षण उपसंचालक अडचणीत?

धक्कादायक :- चांदा शिक्षण प्रसारक मंडळ भ्रष्टाचार प्रकरणी नागपूर शिक्षण उपसंचालक अडचणीत?

न्यायालयीन आदेशाला न जुमानता संस्था सचिव जीवतोडे यांची पाठराखण करणे भोवणार? उच्च न्यायालयात अवमान याचिका..
नागपूर प्रतिनिधी:-

चांदा शिक्षण प्रसारक मंडळातील कथित भ्रष्टाचार प्रकरण आता निर्णायक टप्प्यात पोहोचले असून, या प्रकरणात नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांवरच कारवाईची टांगती तलवार दिसू लागली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही अपेक्षित चौकशी न झाल्याचा आरोप होत असून, यामुळे शिक्षण उपसंचालक यांचेवर न्यायालयीन अवमानाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रकरण काय आहे?

जिल्ह्यातील नामांकित चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे यांच्यावर संस्थेतील विविध गंभीर गैरप्रकारांचे आरोप आहेत. यात बेकायदेशीर नियुक्त्या, शासकीय अनुदानाचा गैरवापर, नातेवाईकांना प्राधान्य देत नियुक्त्या, जबरदस्तीने स्वेच्छानिवृत्ती (VRS) लागू करणे, तसेच गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ देणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे. दरम्यान या सर्व मुद्द्यांवरून संस्थेच्या पिपरी धानोरा शाळेचे माजी मुख्याध्यापक गोपाल सातपुते यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

न्यायालयाचे आदेश काय?

न्यायमूर्ती राज डी. वाकोडे आणि न्यायमूर्ती अनिल एस. किलोर यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालक, नागपूर यांना संपूर्ण चौकशी करून दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच संबंधित सर्व पक्षांना सुनावणीची संधी देत कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

आदेशांकडे दुर्लक्ष?

तक्रारदार गोपाल सातपुते यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही त्यांनी 16 नोव्हेंबर 2022 रोजी राज्याच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर 5 जुलै 2023 रोजी शिक्षण विभागाचे प्रधान सचिवांनीही चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, शिक्षण उपसंचालकांनी या आदेशांकडे दुर्लक्ष करून कोणतीही ठोस कारवाई केली नाही आणि उलट संस्थेच्या सचिवांना संरक्षण दिल्याचा आरोप आहे.

अवमान याचिकेची तयारी.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्यामुळे आता गोपाल सातपुते उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. जर ही याचिका दाखल झाली आणि न्यायालयाने त्यात तथ्य आढळले, तर शिक्षण उपसंचालकांवर थेट कारवाई होऊ शकते.

पुढे काय?

या प्रकरणामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, चांदा शिक्षण प्रसारक मंडळातील कथित कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्थेचे सचिव जिवतोडे यांचे अनेक कारणामे तत्कालीन सर्वच उपसंचालक यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेले असल्याने डॉ. वैशाली जामदार असेल, उल्हास नरड असेल किंव्हा आत्ताच्या डॉ माधुरी सावरकर असेल या सर्वांनी जीवतोडे यांचे संरक्षण केले आहे, मात्र आता त्या उपसंचालकावर न्यायालयाचा बडगा उभारला जाणारं असून आत्ताच्या शिक्षण उपसंचालक यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे, दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात नेमकी कोणावर आणि कितपत कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.