चंद्रपुरात एसीबीची धडक कारवाई! दुय्यम निबंधक व डेटा ऑपरेटर ४ हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद
चंद्रपूर, दि. १६ जून : शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) सातत्याने कठोर कारवाया करत असून, आज चंद्रपूर येथे अशाच एका धडक कारवाईत दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि त्यांच्या डेटा ऑपरेटरला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
News reporter :- अतुल दिघाडे
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयातील अधिकारी मोहन चंद्रकांत शेटट्टीवार आणि त्यांचा डेटा ऑपरेटर यांना ४,००० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल व नोंदणी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या पक्षकाराची भद्रावती तालुक्यात मालमत्ता असून त्या मालमत्तेच्या दस्तऐवजांची नोंदणी (रजिस्ट्री) करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करण्यात आली होती. संबंधित दस्तऐवज नोंदवून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने प्रत्येक रजिस्ट्रीमागे २,००० रुपये याप्रमाणे दोन रजिस्ट्रीसाठी एकूण ४,००० रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले.
मात्र, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चंद्रपूर कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी करून आज, १६ जून २०२६ रोजी सापळा रचला.
सापळ्यादरम्यान आरोपी दुय्यम निबंधक मोहन शेटट्टीवार यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम मागितली आणि ती आपल्या डेटा ऑपरेटरमार्फत स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान आणि अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार तसेच हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, विजेंद्र वाढई, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर आणि संपूर्ण सापळा पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये लाचखोरी करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या लाचेची मागणी झाल्यास तत्काळ एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“लाच देऊ नका, लाच घेणाऱ्यांची माहिती द्या”, असा संदेश एसीबीकडून पुन्हा एकदा देण्यात आला आहे.




