मुनगंटीवारांचा आणखी एक विक्रम! २२ जूनच्या अधिवेशनात तब्बल ३८ अशासकीय विधेयके; संसदीय कार्यात नवा इतिहास
सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय, प्रशासकीय आणि जनहिताच्या प्रश्नांना विधानसभेत मिळणार प्रभावी वाचा
चंद्रपूर/बल्लारपूर :- महाराष्ट्राच्या राजकीय आणि संसदीय क्षेत्रात पुन्हा एकदा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. २२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनासाठी तब्बल ३८ अशासकीय विधेयके विचारार्थ ठेवत त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडून संसदीय कार्यात नवा इतिहास घडविला आहे.
विधानसभेतील अभ्यासू, सक्रिय आणि संसदीय परंपरांचे काटेकोर पालन करणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळख असलेले आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जनहिताचे प्रश्न केवळ आंदोलनातून नव्हे, तर कायदेमंडळाच्या प्रभावी माध्यमातून सोडविण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे राज्याच्या राजकीय आणि संसदीय वर्तुळात त्यांच्या कामाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
लोकशाही व्यवस्थेत विधिमंडळ हे केवळ चर्चा करणारे व्यासपीठ नसून कायदे निर्माण करणारे सर्वोच्च स्थान मानले जाते. अशासकीय विधेयकांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष महत्त्वाच्या विषयांकडे वेधले जाते आणि त्यातून धोरणात्मक निर्णय तसेच आवश्यक कायदेशीर सुधारणा घडून येण्यास मदत होते.
यापूर्वीही सर्वाधिक अशासकीय विधेयके सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून, यंदा ३८ विधेयकांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे. त्यामुळे त्यांना विधिमंडळात आदराने “अशासकीय विधेयकांचा विक्रमवीर” म्हणून संबोधले जाते.
महत्त्वाच्या विधेयकांमध्ये पुढील विषयांचा समावेश
- कारागृहे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक
- महाराष्ट्र जमीन महसूल माफीबाबत विधेयक
- हिंसाचार व लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिरातींवर प्रतिबंध करणारे विधेयक
- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक
- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी व तिसरी सुधारणा) विधेयके
- शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व कामकाजातील विलंबास प्रतिबंध करणारे विधेयक
- महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) सुधारणा विधेयक
- पाणी पुरवठा विभागातील दीर्घकाळ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या न्याय, कल्याण व सेवासुधारणांशी संबंधित विषय
या विधेयकांमधून सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण, प्रशासनातील पारदर्शकता, कर्मचारी हितसंबंध आणि जनकल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय विधानसभेच्या पटलावर येणार आहेत.
२२ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात या विधेयकांवर सविस्तर चर्चा अपेक्षित असून, राज्यातील विविध घटकांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे. जनतेच्या प्रश्नांना कायदेशीर चौकटीत मांडून त्यावर विधायक चर्चा घडवून आणण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची परंपरा यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
त्यांच्या या विक्रमी संसदीय कार्यामुळे चंद्रपूर, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
“आंदोलन नव्हे, कायदेमंडळातून जनहिताचा मार्ग” — आ. सुधीर मुनगंटीवार




