Home भद्रावती सनसनीखेज : अवैध रेती वाहतूक करणारा हायवा पकडला; ट्रॅक्टर मात्र ‘चिरीमिरी’ घेऊन...

सनसनीखेज : अवैध रेती वाहतूक करणारा हायवा पकडला; ट्रॅक्टर मात्र ‘चिरीमिरी’ घेऊन सोडल्याची चर्चा.

भद्रावती महसूल विभागाच्या अवैध रेती वाहतूक प्रकरणातील दोन कारवाया चर्चेत.

भद्रावती :-

भद्रावती महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीविरोधात केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमुळे तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे. एका बाजूला अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला, तर दुसऱ्या घटनेत अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर कथितरित्या ‘चिरीमिरी’ घेऊन सोडण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार राजेश भांडारकर यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर 16 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 5.30 वाजता भद्रावती-चंद्रपूर महामार्गावरील घोडपेठ गावाजवळ कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान एमएच 40 सीटी 0223 क्रमांकाचा हायवा ट्रक अवैधरित्या रेती वाहतूक करताना पकडण्यात आला. ट्रकमध्ये सुमारे चार ब्रास रेती भरलेली असल्याचे सांगण्यात आले.

सदर वाहन चंद्रपूरकडून येत असून त्यामधून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. कारवाईनंतर वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. हा हायवा ट्रक नागपूर येथील कान्होली बारा परिसरातील रहिवासी रवींद्र कवडूजी उडान यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी अनिल दडमल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी राहुल भोंगळे, संदीप मुरकुटे, खुशाल मस्के, शुभम धात्रक तसेच चालक बंडू बेलफुलवार यांनी पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली.

दरम्यान, दुसरीकडे 15 मे 2026 रोजी मध्यरात्री महसूल पथक चारगाव येथील एकता नगर कॉलनी परिसरात गस्त घालत असताना अवैध रेती भरलेला एक ट्रॅक्टर अडविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित ट्रॅक्टर चालकाकडे कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसल्याचे आढळूनही त्याच्याकडून कथितरित्या ‘चिरीमिरी’ घेऊन वाहन सोडण्यात आल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. या घटनेमुळे महसूल विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एका वाहनावर कठोर कारवाई तर दुसऱ्याला मोकळे रान का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.