गुंजेवाहीत वाघाचा भीषण कहर : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा मृत्यू, परिसरात दहशतीचे वातावरण
चंद्रपूर गुंजेवाही :- गुंजेवाही परिसरात आज अत्यंत भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
वनविभागाकडून वारंवार जंगलात जाण्याबाबत सावधगिरीचे निर्देश देण्यात येत असतानाही अनेक नागरिक उपजीविकेसाठी पहाटेच्या सुमारास जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी जात आहेत. आज २२ मे रोजी सकाळच्या वेळी काही महिला गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. याचदरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलांवर हल्ला चढवला.
या भीषण हल्ल्यात ४५ वर्षीय कवडूबाई दादाजी मोहुर्ले, ४० वर्षीय अनिताबाई दादाजी मोहुर्ले, ५० वर्षीय संगिता संतोष चौधरी आणि ३८ वर्षीय सुनीता कौशिक मोहुर्ले यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिलांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
महिलांवर एकाच वाघाने हल्ला केला की त्या परिसरात आणखी वाघ होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात शोधमोहीम व गस्त वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, वर्ष २०२६ च्या अवघ्या पाच महिन्यांत मानव-वन्यजीव संघर्षात आतापर्यंत तब्बल १९ नागरिकांचा बळी गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तीव्र भीती निर्माण झाली असून वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे गुंजेवाही परिसर शोकसागरात बुडाला असून मृत महिलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




