Home चंद्रपूर संतापजनक :- संयुक्त गल्लीत अतिक्रमण करून मारोती वैरागडे यांचे बेकायदेशीर बांधकाम.

संतापजनक :- संयुक्त गल्लीत अतिक्रमण करून मारोती वैरागडे यांचे बेकायदेशीर बांधकाम.

निलेश उपटवार या गंजवार्ड निवासी यांची मनापाकडे तक्रार, पण कारवाई शून्य…..

चंद्रपूर : –

गंजवॉर्ड परिसरातील रामाळा तलाव रोड येथील एका नागरिकाने शेजाऱ्याकडून संयुक्त गल्लीत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचा आरोप करत चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार निलेश उशालू उपटवार यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ते मागील 20 वर्षांपासून गंजवॉर्ड परिसरातील शीट नं. 34 येथील घरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराशेजारी राहणारे मारोती वैरागडे यांनी नवीन बांधकाम सुरू केले असून दोन्ही घरांच्या मधील जवळपास तीन फुटांची संयुक्त गल्ली न सोडता थेट त्यांच्या घराच्या भिंतीलगत कॉलम उभारल्यामुळे त्यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार देऊन हे अतिक्रमण तोडण्याची मागणी केली आहे,

दरम्यान महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर दोन दिवस बांधकाम थांबविण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. तसेच नियमानुसार जागा सोडून बांधकाम करण्याची मागणी केल्यावर मारोती वैरागडे हे शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देतं असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 2 कार्यालयाकडून हे प्रकरण तहसीलदार कार्यालयाकडे वर्ग करण्यात आल्याचे पत्र तक्रारदारास प्राप्त झाले आहे. संबंधित जागा नझुलची असल्याचे सांगण्यात आले असले तरी बांधकाम मंजुरी व कारवाईचे अधिकार महानगरपालिकेकडेच असल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

सदर प्रकरणी सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवून व बेकायदेशीर केलेले बांधकाम अतिक्रमण हटवावे व संयुक्त गल्ल्याची मूळ हद्द कायम करावी, अशी मागणी तक्रारदाराने प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात प्रतिलिपी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, तहसीलदार कार्यालय चंद्रपूर तसेच शहर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनाही देण्यात आली आहे. आता या प्रश्नावर मनपा काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.